अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला आणि समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे या ध्वजारोहण सोहळ्यातून अधोरेखित झाले आहे.

राममंदिरात ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालकांनी गाभाऱ्यात मंत्रोच्चारांच्या घोषात पूजा आणि आरती केली. यानंतर पंतप्रधान, सरसंघचालक आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज इलेक्ट्रीक बटण दाबताच फडकवण्यात आला. हिंदुच्या विजयाची निशाणी असलेला हा ध्वज जमिनीपासून १९१ फूट उंचीवर आहे. ज्याच्या मध्यभागी सूर्य आणि त्यामध्ये ओमचे चिन्ह आहे. तसेच अयोध्याचे राजवंशीय चिन्ह असलेले कोविदार वृक्ष आहे.