ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आणि कर्करोग उपचारासाठी हब-अँड-स्पोक धोरण लागू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी आज संसदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने नूतनीकरण होत असलेले ९०० खाटांचे नवे सिव्हिल हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येचा आणि ओपीडीच्या मोठ्या भाराचा विचार करता, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधुनिक वैद्यकीय शिक्षण व उपचार सुविधा विकसित करणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा खासदार म्हस्के यांनी संसदेत मांडला.
सध्या लाखो रुग्ण उपचारासाठी मुंबईत जातात. त्यामुळे ठाण्यातच सुपर-स्पेशालिटी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल हबमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची मागणी होती.
कर्करोग उपचारासाठी ‘हब-अँड-स्पोक मॉडेल’ लागू केल्यास प्राथमिक तपासणीपासून प्रगत उपचारपर्यंत सर्व सुविधा ठाण्यातच उपलब्ध होतील आणि सर्वसामान्यांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाचेल, असे त्यांनी सांगितले.
खासदार नरेश म्हस्के यांच्या या प्रस्तावामुळे ठाण्यातील आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.
