चिपळूण : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये कोकणातील जलसंधारणाचा मुद्दा ऐरणीवर आला. आमदार शेखर निकम यांनी कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज देण्याची मागणी सभागृहात केली.

कोकणात मोठ्या धरणांना मर्यादा असून लघुपाट बंधारे व लघु जलसंधारण प्रकल्प हे अधिक उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र निधीअभावी अनेक मंजूर प्रकल्प रखडल्याने शेतकरी व ग्रामीण भागाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील लघुपाट बंधाऱ्यांच्या बहुतांश संभाव्य जागा कोकणात असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास कोकण सुजलाम–सुफलाम होऊ शकते, असे निकम म्हणाले. मंजूर प्रकल्प रद्द न करता त्यांना तातडीने निधी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर उत्तर देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कोकणातील प्रकल्पांना शासनाची मंजुरी दिली असून निधी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. जमीन संपादन व प्रशासकीय अडचणींमुळे विलंब होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले.