क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली २ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड कायम ठेवला आहे. या निकालामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत विधिमंडळाला प्राप्त झाल्यानंतर याबाबत अधिकृत कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सध्या कोकाटे बंधू संपर्काबाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

कोकाटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, माणिकराव कोकाटे यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.