मुंबई : ‘वंदे मातरम’प्रमाणेच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतावर विधिमंडळात चर्चा झाली पाहिजे. अशी चर्चा झाली तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात काँग्रेसची भूमिका आणि त्या काळातील इतिहास महाराष्ट्रासमोर येईल. तसेच काँग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरेंचा बुरखा फाटेल, असा घणाघात भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोडून काढण्यासाठी त्यावेळच्या केंद्र व राज्यातील काँग्रेस सरकारने केलेल्या कारवायांचा इतिहासही यानिमित्ताने उघड होईल, असे बन यांनी सांगितले.

महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसून तीनही घटक पक्ष एकत्र बसून येत्या 5 ते 6 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागावाटपाचे सूत्र ठरवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुका महायुती एकत्र लढून जास्तीत जास्त जागा जिंकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उबाठा सेनेला जनतेने सपशेल नाकारले असून विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नसून मतदारांना असतो, असा टोला त्यांनी लगावला. विधानसभेच्या निवडणुकीत 90 जागा लढवून केवळ 20 जागा जिंकल्याने उबाठा गटाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळही गाठता आले नाही, असे बन म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींची गुलामी करत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या ब्रँडिंगसाठी राऊत प्रयत्न करत असल्याची टीकाही केली.

नवाब मलिक निर्दोष ठरत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा किंवा युती करणार नाही. जिथे मलिक नेतृत्व करतील तिथे भाजप युती करणार नाही, प्रसंगी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घ्यावी लागली तरी भाजप आपली भूमिका कायम ठेवेल, असेही बन यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सूचना कराव्यात मात्र त्यावर राजकारण करू नये, असे सांगितले. तसेच रविंद्र चव्हाण शिवसेनेत होते, हा संजय राऊतांचा दावा निराधार असून त्याबाबत पुरावा द्यावा, असे खुले आव्हानही नवनाथ बन यांनी दिले.