दिवा : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या जनभावनेच्या निर्णायक मागणीसाठी २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या जनआक्रोश दिंडी मोर्चाची तयारी दिवा–आगासनगावात वेग घेत आहे. खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा निघणार आहे.
मोर्चापूर्वी दिवा–आगासनगावात ग्रामस्थांच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर गावातून भव्य रॅली काढून तीव्र जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मोठ्या प्रमाणातील उपस्थिती या आंदोलनाला नवी धार देणारी ठरली. महिलांनी हातात पाट्या घेत सरकारकडे एकमुखाने मागणी केली

“विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्या!”

लोकनेते दि.बा. पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, मच्छिमार, शेतकरी, वंचित आणि संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी लढा दिला. या पार्श्वभूमीवर विमानतळाला त्यांचे नाव देणे ही मागणी नसून जनतेच्या भावनांचा सन्मान असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांनी सरकारला ठाम इशारा दिला आहे :

“जनतेचा सन्मान नाकारला तर २२ डिसेंबरला जनआक्रोशाचा ज्वालामुखी उसळेल.”

दिवा–आगासनगावातील सर्व घटकांनी सरकारकडे विनंती केली आहे की, जनभावनेचा आदर करून नामांतराचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.