कुत्र्यांकडून लहान मुले, नागरिकांवर होणारे हल्ले तसेच त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. यापुढे भटक्या कुत्र्यांना मोकळ्या जागेत खायला दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अशा कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण अनिवार्य केले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. राज्य शासनाने सर्व महापालिका/नगरपालिका/नगर पंचायतींनी प्रत्येक नागरी भागात कुत्र्यांना पकडण्यासाठी नियमित मोहीम, त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच ज्या भागात कुत्र्यांचे पुनर्वसन किंवा सोडले जाईल तेथील संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांच्या खाण्याच्या जागा निश्चित करून त्याच ठिकाणी खायला देण्यात यावे. याची खातरजमा करण्यात यावी तसेच मोकळ्या ठिकाणी खायला देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. लसीचा पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश दिले असून जखमी होणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात उपचार सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयांमध्ये ‘अँटी रेबीज’ लस व ‘इम्युनोग्लोब्युलिन’चा साठा अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सरकारी रुग्णालयांना पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भटक्या कुत्र्यांना वाटेल तिथे खावू घालणाऱ्यांना दणका; महाराष्ट्रात नवा नियम लागू
