नागपूर ( विशेष प्रतिनिधी):
मी राज्यमंत्री असताना हेच देवेंद्र फडणवीस माझ्या अपॉइंटमेंटसाठी तासनतास माझ्या बंगल्यावर बसत होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे विकास कामांसाठी एखादे पत्रही घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. विकास कामांसाठी निधी सोडाच सभागृहात साधे बोलूही दिले जात नाही. विरोधकांना अतिशय तुच्छ वागणूक दिली जाते. हा सारा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे अशा स्पष्ट शब्दात ठाकरे गटाचे आ.भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.
नागपूर अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्याच्या अभ्यासू वृत्तीचे मुक्तकंठाने कौतुकही केले. अजित पवार यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे आणि ते प्रचंड काम करतात असा अभिप्राय त्यांनी दिला तर एकनाथ शिंदे यांना ठाण्यापलीकडे कोण ओळखत होतं ? पक्ष फोडून मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात त्यांची ओळख झाली असे परखड मत त्यांनी नोंदवले. या सरकारकडे सभ्यता नावाला शिल्लक नाही.विरोधकांची गळचेपी सुरू आहे.यापूर्वी विरोधक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात तासनतास बोलू दिले जात होते. काँग्रेसने विरोधकांनाही सन्मानाची वागणूक दिली होती.मात्र फडणवीस सरकारला या साऱ्या गोष्टींचे विस्मरण झाले आहे असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला.
सरकार कर्जबाजारी.. कसला विकास?
राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामांचा दावा केला जातोय याकडे लक्ष वेधले असता आ. जाधव यांनी आकडेवारी मांडून सरकारचा हा दावा पोकळ आहे अशी टिप्पणी दिली. राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे, तर राज्याचे बजेट आहे सात लाख वीस हजार कोटींचे आणि आता दोन वेळा एक लाख ७४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सरकारला सभागृहात मंजूर कराव्या लागल्या. या आकडेवारीवरून सरकार आर्थिक संकटात असताना विकास कुठून करणार असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.
हायवे २०२८ पर्यंत पूर्ण होत नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी एप्रिल २०२६ ही नवीन डेडलाईन दिली आहे यावर प्रतिक्रिया देताना आ. जाधव म्हणाले की, मुळात हा नवीन महामार्ग होत नसून जुना मुंबई गोवा महामार्ग आहे त्याचेच हे रुंदीकरण केले जातेय.केवळ माणगाव ,वडखळ आणि इंदापूरमध्ये डायव्हर्शन आणि कशेडी बोगदा या नवीन कामांशिवाय संपूर्ण रस्त्याचे केवळ रुंदीकरणाचे काम होतंय. मी या कामासाठी अनेक वेळा गडकरींना भेटलो.त्यांच्याशी चर्चा केली आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर तुम्ही डेडलाईन देऊ नका,त्यापेक्षा पनवेल ते चिपळूण असा व्हॅनिटी व्हॅनने प्रवास करून रस्त्याची काय अवस्था आहे हे पहा असा सल्लाही त्यांना दिला. कारण एकही अधिकारी या कामाकडे जातीने लक्ष देत नाही. त्यामुळे २०२८ पर्यंत तरी या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
भाजपात जाण्याचा विषय नाही…
ईडीची भीती वाटत नाही का या प्रश्नावर ईडीची भीती वाटण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही असे आपल्या खास शैलीत त्यांनी सांगितले. भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही.मी जी भूमिका घेतो ती लपून जपून घेत नाही तर जाहीरपणे घेतो. कधी काही ठरवून करीत नाही असं स्पष्ट खुलासा त्यांनी केला. मुलासाठी जिल्हाप्रमुख पद मागण्यासाठी मातोश्रीवर कधीच गेलो नव्हतो तसेच चिपळूण पालिका निवडणुकीत आघाडीतर्फेच लढायचे असा आमच्याच लोकांनी निर्णय घेतला होता असे स्पष्टीकरणही त्यांनी केले..
मला जे मिळाले त्यामध्ये मी समाधानी असलो तरी दुर्दैवाने मला योग्य संधी मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. अर्थात हा नशिबाचा भाग आहे.जे ललाटी आहे ते मिळणारच आहे आणि जे नशिबात नाही त्याला कोण काय करणार? मंत्री म्हणून अल्पकाळ काम करण्याची संधी मिळाली, मात्र पुन्हा संधी मिळाली तर माझ्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देईन अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.विरोधी पक्षनेता निवडीसाठी दहा टक्के सदस्य संख्येची अट ना कायद्यात, ना नियमात, ना घटनेत आहे. तशी तरतूद असेल तर सरकारने सिद्ध करावे असे आव्हानही त्यांनी दिले.
