मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने ५ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या ‘शाळा बंद’ आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिली.
या निर्णयामुळे मुंबईतील सर्व शाळा उद्या (५ डिसेंबर २०२५) बंद राहणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मुख्याध्यापक संघटनेतर्फे मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात संस्थाचालक संघटना आणि इतर सर्व शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत.
✦ प्रमुख मागण्या
- २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करावा.
- १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयाऐवजी जुने निकष लागू करावेत.
- टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करावा. परीक्षा न दिल्यास किंवा नापास झाल्यास नोकरी करता येणार नाही, अशी अट मागे घ्यावी.
- १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती (ACP) योजना लागू करावी.
- ‘शिक्षणसेवक’ पद रद्द करून थेट कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.
अनिल बोरनारे यांनी सांगितले की, या सर्व मागण्यांसाठीच हा संप पुकारण्यात आला असून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
