मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असून, २०१७ मधील पक्षीय संख्याबळात गेल्या तीन वर्षांत मोठा बदल झाला आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट याचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या राजकारणावर झाला असून, भाजपचे संख्याबळ वाढले आहे, तर शिवसेनेचे संख्याबळ दुभंगले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आधीच मर्यादित ताकद आणखी कमी झाली आहे.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. २०१७ मध्ये कोणत्या पक्षाकडे कोणती जागा होती, हा मुद्दा यावेळी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय उलथापालथीमुळे आताचे पक्षीय बलाबल हेच जागावाटपात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांच्या प्रवेशानंतर तसेच पोटनिवडणुकांमुळे ही संख्या जवळपास शंभरावर पोहोचली होती. मात्र, पक्षफुटीनंतर अनेक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने ठाकरे गटाकडे सध्या ५६ नगरसेवक उरले आहेत, तर शिवसेना (शिंदे) गटाकडे ५८ नगरसेवक आहेत.

भाजपचा एकही माजी नगरसेवक गेल्या नऊ वर्षांत पक्ष सोडून गेलेला नाही. उलट शिवसेना (ठाकरे) पक्षातील तेजस्वी घोसाळकर आणि काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर यांच्या प्रवेशामुळे भाजपकडील माजी नगरसेवकांची संख्या ८४ झाली आहे.

काँग्रेसकडे २०१७ मध्ये ३१ नगरसेवक होते, मात्र सध्या ही संख्या १८ वर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २०१७ मध्ये ९ नगरसेवक होते, तर सध्या शरद पवार आणि अजित पवार गट मिळून केवळ ४ नगरसेवक उरले आहेत. मनसेचे सध्या एकही नगरसेवक महापालिकेत नाहीत.

दरम्यान, २०१७ मधील काही माजी नगरसेवक आमदार किंवा खासदार झाले असून काही माजी नगरसेवकांचे निधन झाले आहे. या सर्व बदलांचा थेट परिणाम येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर होणार आहे.