नाशिक – सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिकांच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली २ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड कायम ठेवला आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी मिळालेल्या सदनिकांच्या बनावट कागदपत्रांवर आधारित या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे दोषी ठरवले गेले आहेत. प्रथम वर्ग न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केली होती, मात्र न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली.
जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी हा निर्णय दिला असून, यामुळे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी या प्रकरणाच्या निकालानंतर विरोधकांकडून त्यांचे राजीनामा मागणी देखील केली जात होती.
सुमारे ३० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या व्ह्यू अपार्टमेंटमध्ये अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून मिळवण्यात आल्या होत्या. तत्कालीन राज्यमंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर सदनिकांचे वाटप तपासण्यात आले.
सदर प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे आणि इतर दोषींना शिक्षा सुनावली असून, आता राजकीय वर्तुळात या निर्णयाचा परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
