सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यातील २९ महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
महानगरपालिका निवडणुका
- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लवकरच संपत असल्याने, डिसेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात कधीही महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
- प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, १० डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.
- निवडणुका पूर्ण होण्यासाठी जानेवारी २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो, म्हणून आयोग तातडीने कार्यक्रम जाहीर करणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुका
महापालिकांच्या घोषणेबरोबरच या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता, मात्र मतदानाच्या तारखा वेगळ्या असू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने ग्रामीण भागात ५०% आरक्षणाची मर्यादा पाळणे बंधनकारक केल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका सध्या घेता येणार नाहीत.
न्यायालयाने १२ जिल्हा परिषदांमध्ये (आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे:
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
