मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
बावनकुळे म्हणाले की, जिल्हा पातळीवरील नेतृत्वाला महायुतीची बांधणी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी ५–१० टक्के जागांवर मतभेद असू शकतात, परंतु त्यावर फडणवीस–शिंदे स्वतः बसून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेसाठी ‘चार प्लस चार’ समन्वय समिती स्थापन होणार असून भाजप–शिवसेनेचे चार-चार पदाधिकारी जागावाटपाचा आराखडा तयार करतील. मतभेद उद्भवल्यास वरिष्ठ नेते तोडगा काढतील. मुंबई महापौरपदाचा अंतिम निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार घेतील.
अजित पवार महायुतीसोबत नसल्याच्या चर्चेला पूर्णविराम देत बावनकुळे म्हणाले, “अजित पवार हे महायुतीचा अविभाज्य घटक आहेत. मागील निवडणुकांत काही मतभेद होते, मनभेद नाहीत. आगामी सर्व लढाया आपण एकत्र लढणार आहोत.”
विदर्भाच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजप सरकारने २०१४ नंतर विदर्भाच्या विकासाला वेग दिला असून, विदर्भात सर्वाधिक जंगलक्षेत्र असल्याने वन विभागाचे मुख्यालय मुंबईत हलवण्याचा प्रश्नच नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
