चिपळूण: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना चिपळूण मधील सर्वपक्षीय जनतेने शोकसभेत आदरांजली अर्पण केली. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही शोकसभा झाली.

या शोकसभेत आपल्या भावना मांडताना आमदार भास्करशेठ जाधव यांनी सांगितले की, “मी अजितदादांसोबत पंधरा वर्षे काम केले. सहकारी, विधिमंडळातील सदस्य आणि पक्षाध्यक्ष म्हणून त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांचा करारी स्वभाव, हळवे मन आणि शिस्तप्रियता हे सर्व अनुभवता आले.”

नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, “मी नगराध्यक्ष झाल्यानंतर अजितदादांनी स्वतः फोन करून अभिनंदन केले. चिपळूण शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याआधीच त्यांनी शहरासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता. मी वेगळ्या पक्षात असतानाही ते माझ्या कार्यालयात आले, माझ्या कुटुंबीयांची चौकशी केली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. असा नेता विरळाच. आज त्यांच्या जाण्यामुळे माझे वैयक्तिक, चिपळूण शहराचे तसेच महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.” हे सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या.

शिरीष काटकर यांनी, “आपण सर्वांनी वेळ पाळायला शिकलो तर तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल,” असे मत व्यक्त केले. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी वेगळ्या पक्षात असतानाही अजितदादा पवार यांचा आपल्यावर असलेला स्नेह सांगत आठवणी जागवल्या. श्रीमती सुमतीताई जांभेकर यांनीही त्यांच्या आठवणी सांगितल्या, तर माजी सभापती पूजाताई निकम यांना अजितदादांविषयी बोलताना भावना अनावर झाल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार सतीश कदम यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा व स्वभावातील विविध पैलूंचा आढावा घेतला.
यानंतर माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, रामदास राणे, मोहनशेठ मिरगल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी नगराध्यक्ष रिहाना बीजले, माजी नगरसेवक राजू भागवत, दीपिका कोतवडेकर, सहदेव चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या शोकसभेला चिपळूण शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY