चिपळूण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान चिपळूणच्या गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगा महोत्सवाला उद्या शनिवार दि. २८ फेब्रुवारीपासून मोठ्या जल्लोषात भक्तीभावाने प्रारंभ होत आहे. उद्या दुपारी तीन वाजता देवतांच्या सजवलेल्या पालख्या पेठमापकडे प्रस्थान ठेवतील आणि उत्सवाला प्रारंभ होईल.

संपूर्ण कोकणात शेरणे कार्यक्रमामुळे श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. गुलाल मुक्त आदर्श शिमगा महोत्सव अशी या उत्सवाची विशेष ख्याती आहे. गोवळकोट,पेटमाप आणि मजरेकाशी येथील ग्रामस्थ आणि देवस्थानच्या विश्वस्त कमिटीने शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे. शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी व निसर्गाच्या सान्निध्यात श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान स्वयंभू ,जागृत आणि प्राचीन असून पटवर्धन, दीक्षित गोळे आदी कुळांची श्री करंजेश्वरी माता ही कुलस्वामिनी आहे.

शेरणे कार्यक्रमामुळे या देवस्थानचा शिमगोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उत्सवाला पुणे-मुंबईतील चाकरमान्यांसह अगदी परदेशी पाहुणेही आवर्जून भेट देतात.
यावर्षी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे. गोवळकोट व पेठमाप भागात जागोजागी सजावट केली आहे. काही ठिकाणी देखावेही उभारण्यात आले आहेत. याशिवाय पेठमाप येथे वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर यात्रोत्सवाची तयारी देखील जोरदार सुरू झाली आहे. उद्या शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता या शिमगोत्सवास प्रारंभ होणार आहे. या मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक होणार आहे. यानिमित्त देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर मशिदभेटीचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. चौघुले कुटुंबियांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जाणार आहे. त्यानंतर सहाणवाडी येथे होम लावून श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीसाठी जाईल. याठिकाणी मानकरी जगताप कुटुंबियांतर्फे पूजा झाल्यानंतर पालखीचे पेठमापच्या दिशेने प्रयाण होणार आहे. रात्री बाजारपुलाच्या ठिकाणी भैरी देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर व पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारत दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी पहाटे होम लावून दोन्ही पालख्या पेठमाप येथील सहाणेवर विराजमान होणार आहेत. याठिकाणी देवीची ओटी भरण्याचा व रात्री करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि.२ मार्च रोजी दुपारी ३ वाजल्यापासून या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी या दोन्ही पालख्यां गोवळकोटच्या दिशेने रवाना होतील.

३ मार्च रोजी पहाटे गोवळकोट सहाणवाडी येथे होम लावून तेथील सहाणेवर दोन्ही पालख्या विराजमान होतील. येथेही देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीने पालख्या मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता केली जाणार आहे. तरी भाविक भक्तांनी उत्सवाचा आनंदाने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH