चिपळूण: भक्तांचे श्रद्धास्थान गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व आदिशक्ती श्री करंजेश्वरी देवस्थानच्या भक्तांनी अर्पण केलेल्या सुवर्णदानातून तयार करण्यात आलेल्या ९०० ग्रॅमच्या सुवर्ण मुखवट्याची काल रविवारी सायंकाळी प्रसन्न वातावरणात शहरातून भव्य शोभायात्रा काढून हा मुखवटा गोवळकोट येथील देवस्थानात वाजत गाजत नेण्यात आला.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर व सर्व विश्वस्त मंडळी त्याचबरोबर पेठमाप, माजरेकाशी आणि गोवळकोट येथील हजारो भाविक, देवीचे कुळभक्त अशा सर्वांची यावेळी मोठी गर्दी उसळली होती. चिपळूणचे श्रद्धास्थान श्री जुना कालभैरव देवस्थान येथून ही शोभायात्रा वाजत गाजत निघाली. शिवसृष्टीला अभिवादन करून चिंचनाकामार्गे बाजारपेठ, बाजारपूल, गोवळकोट रोड मार्गे सायंकाळी उशिरा देवस्थानात पोहोचली. लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सारे भक्त आनंदाने शोभायात्रेत तल्लीन झाले होते. महिला आणि पुरुष भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन डोक्यावर फेटे परिधान केले होते. ढोल आणि झांज पथक याबरोबरच वारकऱ्यांची दिंडी सहभागी झाली होती. देवस्थानचे भोईराज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या हातामध्ये भगवे झेंडे, मुखामध्ये करंजेश्वरीच्या जयजयकाराच्या घोषणा आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
येत्या २८ फेब्रुवारीपासून देवस्थानचा चार दिवसीय शिमगा महोत्सव सुरू होणार असून त्यापूर्वीच पुण्यातील सुवर्णकारांनी देवीचा ९०० ग्रॅम सुवर्ण मुखवटा तयार करून वेळीच उपलब्ध करून दिल्यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. ढोल पथक, टाळ मृदुंगाचा गजर, जयजयकाराच्या घोषणा यामुळे सारे वातावरण दुमदुमून गेले होते. अतिशय शिस्तबद्धपणे ही शोभायात्रा काढण्यात आली.
फुलांनी सजवलेल्या वाहनातील पालखीत देवीचा सुवर्ण मुखवटा..
फुलांनी सजवलेल्या एक वाहनामध्ये देवीची चांदीची पालखी विराजमान होती. त्यामध्ये देवीचे रूपे अर्थात सुवर्ण मुखवटा सर्वांना दर्शन घेता येईल अशा पद्धतीने ठेवण्यात आला होता. त्यामुळे देवीच्या लखलखीत सुवर्ण मुखवट्याचे अर्थात नव्या रूपाचे सर्वांनाच दर्शन घडले आणि देवस्थानच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यंदाच्या शिमगा महोत्सवात सुवर्ण मुखवटा पालखीमध्ये विराजमान असणार आहे.
