चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या १८ जागांसाठी मिळून एकूण ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. उद्या शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होत आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून तालुक्यात २४५ मतदार केंद्रांवर १ लाख ८३ हजार ६७३ मतदार हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आजची रात्र सर्वच उमेदवारांसाठी रणनीती, गुप्त नियोजन यावर भर देणारी ठरणार आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डा, खेर्डी, आलोरे, शिरगाव येथील हाय व्होल्टेज लढतीलमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. तालुक्यातील कळवंडे, पेढे, खेर्डी, अलोरे, शिरगांव, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे या जिल्हा परिषदेच्या ९ गटात तर भोम, कळवंडे, पेढे, दळवटणे खेर्डी, कापसाळ, अलोरे, पिंपळीखुर्द, वेहेळे, शिरगाव, सावर्डे, मांडकी, उमरोली, गुढे, निवळी,, वहाळ, कोकरे, कुटरे या पंचायत समितीच्या १८ गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २४५ केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील ३१ मतदान केंद्रात १ हजाराहून जास्त मतदारांची संख्या आहे. पेढे येथे ११४९ मतदारांचे सर्वात मोठे केंद्र असून, गुढे येथे सर्वाधिक कमी १९२ मतदारांची संख्या असलेले केंद्र आहे. यावेळी ४०४६ मतदार हे दुबार मतदार आढळले आहेत; मात्र त्यांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्यासाठी संबंधित दुबार मतदारांचे प्रशासनाकडून लेखी पत्र घेण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी ३४० पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तीन फिरते भरारी पथक कार्यरत राहिले. पेढे फरशीतिठा, कुंभालों चेकपोस्ट, खेरशेत टोलनाका, मार्गताम्हाणे सुरळ फाटा, आबलोली मूर्तवडे फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथके तैनात ठेवली होती. ही पथके कार्यरत असली तरी कुठेही कारवाई झालेली नाही; मात्र आता ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आह. चिपळूण शहरातील यु इ स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात ९ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतपेट्या रवाना करण्यात आल्या. शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवडणूक यंत्रणा मार्गस्थ करण्यासाठी मग्न होती. एसटी व खासगी गाड्यांच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील सर्व २४५ मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना झाल्या. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आतापासून ठेवण्यात आला आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
