दापोली : तालुक्यातील हर्णे येथून यंदाच्या आंबा हंगामाची अधिकृत सुरुवात झाली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्णे येथील आंबा बागायतदार सागर मयेकर यांच्या बागेतील हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याकडे रवाना करण्यात आली. हंगामाच्या प्रारंभीच या आंब्यांना तब्बल २७०० रुपये प्रतिडझन असा दर मिळाल्याने बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
हर्णे परिसर समुद्रकिनारी असल्यामुळे येथील हवामान आंबा पिकासाठी अत्यंत पोषक मानले जाते. खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श, योग्य आर्द्रता आणि उबदार वातावरण यामुळे येथील हापूस आंबा चविष्ट, सुगंधी आणि आकर्षक रंगाचा तयार होतो. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत हर्णेच्या आंब्याला विशेष मागणी असते.आंबा बागायतदार सागर मयेकर म्हणाले, “यंदा हंगामाची सुरुवात चांगल्या दराने झाली याचा आनंद आहे. हर्णे परिसरातील हवामान आणि योग्य व्यवस्थापनामुळे आंब्याची गुणवत्ता उत्तम राखता आली. पहिल्याच पेटीला २७०० रुपये प्रतिडझन दर मिळाल्याने मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते. पुढील काळातही हवामान साथ देईल आणि बाजारात दर टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे. ग्राहकांना दर्जेदार हापूस देण्यावर आमचा भर कायम राहील.”
दापोलीतून आंब्याची पहिली पेटी पुण्याकडे रवाना
