डेरवण, ता. ५: डेरवणसारख्या ग्रामीण भागात एसव्हीजेसीटीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा क्रीडासंकुलात उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय, डेरवण यूथ गेम्समुळे खेळाडूंच्या क्रीडानैपुण्याला दरवर्षी संधी मिळत असते. खेळांसाठी आवश्यक शिस्त रुजवणे, खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा, खेळाला अनुकूल वातावरण हे या क्रीडा महोत्सवाचे खरे यश आहे, असे म्हणावे लागेल. असे गौरवद्गार क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी काढले.
डेरवण येथील क्रीडा संकुलात विविध खेळात सहभागी झालेल्या खेळाडूंशी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या मातीतील क्रीडागुणांना वाव मिळावा, ही गुणवत्ता वेळीच ओळखून ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कोकणामध्ये एसव्हीजेसीटीतर्फे ‘डेरवण यूथ गेम्स‘ या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन केले जात असून, कोकणचे मिनी ऑलिम्पिक अशी ओळख बनलेल्या या महोत्सवाचे यंदा बारावे वर्ष आहे. राज्याच्या विविध भागांतून पाच वर्षे ते १९ वर्षे या दरम्यानचे सुमारे सहा हजारांहून अधिक खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक यानिमित्ताने डेरवणमध्ये दाखल होतात.
खेळाडूंना अफाट ऊर्जा देणारा आणि ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा महोत्सव आता एका उंचीवर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील वेळापत्रकामध्ये ‘डेरवण यूथ गेम्स’ने महत्त्वाचे स्थान पटकावले असून, खेळाडू याकडे दरवर्षी लक्ष ठेवून असतात. विशेष म्हणजे फारशी जाहिरातबाजी, मार्केटिंग न करताही, उत्कृष्ट आयोजन, नियोजन, चोख व्यवस्था, भरघोस बक्षिसे यांच्या बळावर हा महोत्सव आगळावेगळा ठरला आहे.
केवळ क्रीडा महोत्सवच नव्हे, तर वर्षभरात येथे विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. बऱ्याच ठिकाणी क्रीडासंकुलामध्ये सराव करण्यासाठी खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र ‘एसव्हीजेसीटी’चे क्रीडासंकुल खेळाडूंसाठी कायम उपलब्ध असते. कोणत्याही सोपस्कारात न अडकविता, केवळ महत्त्वाची कागदपत्रे पाहून खेळाडूंना येथे सरावासाठी प्रवेश दिला जातो. हे क्रीडासंकुल सर्वांसाठी खुले असून प्रति महिना केवळ रु. ३००/- निवासी शुल्क व नाममात्र फी घेऊन खेळाडूंना उपलब्ध करून दिले जाते. हे सारे करताना, तुम्ही आमचेच नाव पुढे वापरायला हवे, अशी कोणतीही अट खेळाडूंना घातली जात नाही. या ठिकाणी व्यायामशाळा, स्विमिंग पूल, गेट ॲनालिसिस, फोर्स प्लेट आदी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांसाठी इतर क्रीडासंकुलांमध्ये लाखो रुपये खर्च करावे लागतात, मात्र एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात हे नाममात्र शुल्कात उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे सायकॉलॉजी, न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपी यांचीही व्यवस्था असून या सुविधांचा खेळाडूंना सातत्याने फायदा होत असतो.
एकूण १९ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा ‘डेरवण यूथ गेम्स’मध्ये घेतल्या जातात. त्यात खो-खोपासून कबड्डीपर्यंत आणि बुद्धिबळापासून नेमबाजीपर्यंत बैठ्या, मैदानी सर्वच खेळांचा समावेश आहे. दरवर्षी सहा-सात हजार खेळाडूंचा सहभाग, क्रीडानैपुण्याचे प्रदर्शन, खेळाडूंचा मैदानावरील जोश, उत्साह, क्रीडाप्रेमींची उपस्थिती यामुळे ‘डीवायजी’चे नाव आता देशभर पोहोचले आहे. दरवर्षी न चुकता डेरवण यूथ गेम्सना येणाऱ्या संघांची, खेळाडूंची संख्या वाढते आहे. वैयक्तिक खेळ, संघांतील अटीतटीच्या लढती यामुळे दरवर्षी आठ दिवस येथील वातावरण क्रीडामय झालेले असते.
या बारा वर्षांमध्ये ‘डेरवण यूथ गेम्स’ला विविध क्रीडा संघटनांचे पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. तसेच ज्येष्ठ संघटक व खो – खो असोसिएशनचे पदाधिकारी संदीप तावडे, पुणे येथील क्रीडा संघटक व जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे सचिव संदीप जोशी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मल्लखांब संघटनेचे पदाधिकारी शांताराम जोशी आदींचे या स्पर्धांसाठी मोठे योगदान लाभत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
