छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ व थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात यशस्वीरीत्या फुलवले आहे. गणेश बलांडे यांनी प्रत्येकी पाच गुंठे अशा एकूण १० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. केवळ तीन ते चार महिन्यांत या पिकातून सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, येत्या काळात उत्पन्नात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
फुलंब्रीच्या बोरगाव अर्ज गावातील प्रगतशील शेतकरी गणेश बलांडे आणि त्यांच्या भावाला मोबाईलवर स्ट्रॉबेरी लागवडीची जाहिरात पाहिल्यानंतर ही कल्पना सुचली. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी उत्पादन होते, तर मराठवाड्यात का नाही? असा विचार करून त्यांनी महाबळेश्वर येथील मित्र सतीश भापकर यांच्याशी संपर्क साधला. मराठवाड्यातील तापमान सहन करणारा ‘विंटर डाऊन’ हा वाण निवडला. हा वाण सुमारे ३५ अंश तापमान सहन करू शकतो, असे बलांडे यांनी सांगितले.
उत्पादनाची विक्री त्यांनी अजिंठ्याकडे जाणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना फुलंब्री गावातील रस्त्यावर सुरू केली. तीन महिन्यांत सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च वजा जाता ३ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सध्या दररोज सुमारे १० किलो स्ट्रॉबेरी उत्पादन मिळत असून सुरुवातीला ४०० रुपये किलो दर होता; सध्या २०० रुपये किलो दर मिळत आहे. पुढील चार महिने हे पीक चालणार आहे. तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड नसल्याने जिल्हाभरातून ग्राहक फोनवरून ऑर्डर देत आहेत. स्थानिक विक्रीमुळे वाहतूक खर्चही वाचत आहे. आगामी काळात १ एकरवर स्ट्रॉबेरी लागवडीचा त्यांचा मानस आहे.
थंड हवामान नसतानाही पीक टिकवण्यासाठी बलांडे बंधूंनी विशेष तंत्रज्ञान वापरले. काळ्या मल्चिंगऐवजी सिल्व्हर-ब्लॅक मल्चिंग पेपर वापरल्याने सूर्यप्रकाश परावर्तित होऊन उष्णता कमी झाली. रोपांच्या खाली वाळलेल्या कुट्टीचा चारा अंथरून मातीला थंडावा दिला. ठिबक सिंचन व सेंद्रिय खतांचा वापर करून पानांवरील पिवळेपणा व सुकण्याची समस्या टाळली.
स्ट्रॉबेरी लागवड कशी केली?
बलांडे यांनी महाबळेश्वरहून प्रत्येकी १० रुपये दराने ५ हजार रोपे विकत घेतली. लागवडीसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च आला. चार फूट रुंदीचे बेड तयार करून एक फूट अंतरावर रोपे लावली. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. दररोज सकाळी ६ ते ७ वाजता स्ट्रॉबेरी तोडून अर्धा किलो व एक किलोचे बॉक्स तयार केले जातात. सुरुवातीला ४०० रुपये किलो दराने विक्री होत होती; सध्या २०० रुपये किलो दर मिळत आहे. योग्य सिंचन व खत व्यवस्थापन केल्यास पिकाची देखभाल तुलनेने कमी करावी लागते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY