सांगली ( प्रतिनिधी) ज्येष्ठ पुरोगामी नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे. सांगली येथे राहत्या घरी समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने समीर गायकवाडचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरमध्ये 16 फेब्रुवारी 2015 रोजी ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. पानसरे यांच्या हत्येचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते.

या प्रकरणात 2016 मध्ये समीर गायकवाडला अटक करण्यात आली होती. पानसरे हत्या प्रकरणातील तो प्रथम क्रमांकाचा मुख्य संशयित आरोपी होता. अटकेनंतर 22 महिने तुरुंगात राहिल्यानंतर, 2017 मध्ये समीर गायकवाडला जामीन मंजूर झाला होता. मात्र जामिनानंतर समीर गायकवाड दबावाखाली होता, आणि त्याच दबावातून त्याचा मृत्यू झाला असावा, असा दावा समीर गायकवाडच्या वकिलांनी केला आहे.