खेड ( चंद्रकांत बनकर ) :उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय, खेड यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी, सिंगल विंडो पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाची अंमलबजावणी करत महसूल विभागाच्या सेवा अधिक गतिमान करणे, प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे. नागरिकांना वारस तपास, फेरफार (फरफार) नोंदी, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, डिजिटल ७/१२ वितरण, तसेच विविध दाखले – उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमी लेयर आदी प्रमाणपत्रे शिबिरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
याशिवाय ई-मोजणी, आधार संबंधित सेवा, पी.एम. किसान योजना, आरोग्य शिबीर, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यांसारख्या सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजिटल सेवा व ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ प्रणालीचा प्रभावी वापर करून नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
महसूल विषयक दैनंदिन तक्रारी एकाच ठिकाणी स्वीकारून त्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे. तसेच जमीन विषयक विविध प्रकरणांबाबत मार्गदर्शन, जनजागृती आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी संबंधित मंडळानुसार आयोजित शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी शिबिराच्या निश्चित तारखेनुसार उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
