खेड |( चंद्रकांत बनकर )
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. खेड तालुक्यात एकूण 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण, अशा एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत दयाळ आणि भडगाव या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये कोकणातील दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने संपूर्ण कोकणाचे लक्ष खेडकडे लागले आहे.
शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी गेल्या आठवडाभरात खेड तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवला आहे. सभा, बैठक, मतदारांशी थेट संवाद अशा आक्रमक प्रचारातून शिवसेनेने तालुक्यात वातावरण तापवले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 21 पैकी 21 जागांवर निर्विवाद विजय मिळवला होता. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 21 पैकी 21 जागांवर शिवसेनेचेच उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास रामदास भाई कदम यांनी व्यक्त केला आहे.
भडगाव गटात तटकरे विरुद्ध शिवसेना
खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान रत्नागिरी–रायगड खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे मेहुणे अजय शांताराम बिरवटकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून तरुण, तडफदार आणि कुणबी समाजाचा चेहरा म्हणून ओळख असलेले रवींद्र पांडुरंग रेवाळे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या गटात तटकरे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दयाळ गटात थेट भावकीचा आणि नेतृत्वाचा सामना
दुसरीकडे दयाळ जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम यांचे सख्खे लहान भाऊ अरुण गंगाराम कदम शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे उभे असून त्यांच्या पाठीशी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांची ताकद आहे. त्यामुळे हा सामना केवळ उमेदवारांपुरता न राहता नेतृत्वाच्या प्रतिष्ठेचा थेट संघर्ष बनला आहे.
अनुभव विरुद्ध आव्हान
अरुण कदम हे अत्यंत अनुभवी उमेदवार असून त्यांनी यापूर्वी पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषद सभापतीपद भूषवले आहे. मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड मानली जाते. याच गटातून याआधी माजी आमदार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजयराव कदम निवडून गेले होते. सध्या ते शिवसेनेचे उपनेते असल्याने या मतदारसंघात शिवसेनेचा वचक भक्कम असल्याचे चित्र आहे.
21 चा आकडा पुन्हा गाठण्याचा शिवसेनेचा निर्धार
खेड नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. यासाठी रामदास भाई कदम आणि उपनेते संजयराव कदम यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून प्रचाराचा शेवटचा टप्पा अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
मतदार राजा काय निर्णय देणार?
दयाळ आणि भडगाव या दोन गटांतील निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता कोकणातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारे ठरणार आहेत. अखेर मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो, हे 9 फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
प्रचार करण्यासाठी मिळालेल्या अवधीमध्ये शिवसेनेकडून जोरदार प्रचार सुरू आहे शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास भाई कदम यांच्यासह उपनेते संजयराव कदम तसेच सर्व पदाधिकारी घराघरात पोहोचले आहेत प्रचाराचा अक्षरशः भगवा वनवा पेटलेला पाहायला मिळत आहे, विरोधकांकडून मात्र कोठेही जाहीर प्रचार सभा आणि बैठका होत असलेले पाहायला मिळत नाही घरोघरी प्रचार मात्र सुरू असल्याचे पाहायला मिळते, प्रचार आणि प्रचंड रणधुमाळी ही शिवसेनेकडून पाहायला मिळते आता निकालाच्या दिवशी या वनव्याचे तीव्रता समोर येणार आहे
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
