चिपळूण (विशेष प्रतिनिधी): कोकणात मोठे प्रकल्प आणताना लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषण करणारे प्रकल्प मात्र सरकार चालू देणार नाही असे ठाम वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना दिले तेव्हा उपस्थित शेकडो उत्साही कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून सभागृह दणाणून सोडले. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना महत्त्वाचे पद दिले जाईल असा शब्द त्यांनी दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली.
चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या सेना-भाजप रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी ना. शिंदे आज दुपारी चिपळूणमध्ये आले होते. त्यावेळी प्रचार सभेत त्यांनी सर्वांना संबोधित केले.
ना.शिंदे म्हणाले की, कोकण ही भूमी नितांत सुंदर, निसर्ग संपन्न असून या भूमीत लक्ष्मी ऑरगॅनिक सारखे प्रदूषण करणारे प्रकल्प राहणार नाहीत. येत्या काही काळात कोकणात मोठ,मोठे प्रकल्प येत असून सरकारतर्फे ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट राबवला जातोय शिवाय कोकण विकास प्राधिकरण आणतोय तसेच कोकणविकासाठी निधीला कुठेही कात्री लावली जाणार नाही. कारण कोकणी जनतेने शिवसेनेवर नितांत प्रेम केले. शिवसेनेला भरभरून दिले. त्यामुळे आता कोकण भूमीला निधी देताना आम्ही हात आखडता घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना सांगितले की रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण कोकणात शिवसेनेचा झंझावात आता कोणीही रोखू शकणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाजपवर आरोप करताना सांगितले की, खेडमध्ये मला घेरण्याचा प्रयत्न होतोय आणि काही लोक जाणीवपूर्वक ठाकरे गटाला बळ देण्याचे काम करत आहेत, मात्र नगरपालिकेत ज्याप्रमाणे आम्ही २१च्या २१ जागा जिंकल्या त्याचधर्तीवर खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के जिंकू असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिपळूणमधील एका सभेमुळे नगरपालिकेत सत्ता मिळाली आता पुन्हा शिंदे साहेब चिपळूणमध्ये सभा घेत असल्यामुळे यश हमखास मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वांनी आदरांजली अर्पण केली. व्यासपीठावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शशिकांत चव्हाण,भाजपचे नेते प्रशांत यादव,स्वप्ना यादव, सेनेचे पदाधिकारी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर,रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
