लांजा:

लांजा शहराच्या मध्यातून गेलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुलाखाली अंडरपास ब्रिज व्हावा यासाठी लांजा- राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मंत्रालयात सातत्याने केलेला पाठपुरावा आणि लांजा शहर समन्वय समितीने केलेल्या मागणीनुसार अंतिम पाहणीसाठी बुधवारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
लांजा वासीयांनी केलेली अंडरपास ब्रिजची केलेली मागणी योग्य असल्याचे स्पष्ट संकेत देत ती मान्य करून अंडरपास ब्रिजच्या दृष्टीने पुढील कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल असे मुख्य अभियंता यांनी आश्वासित केले. त्यामुळे लांजा वासीयांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. सद्या लांजा शहराच्या मध्यातून गेलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणच्या उड्डाण पुलाच्या अंतिम टप्याच्या कामाने वेग घेतल्याचे सद्या पहायला मिळते आहे.
दरम्यान लांजा शहरातून गेलेल्या महामार्ग पुलाखाली अंडरपास ब्रिज व्हावा यासाठी शहर समन्वय समितीने आमदार किरण सामंत यांच्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार आमदार सामंत यांनी वारंवार मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. अखेर आमदार किरण सामंत यांनी केलेल्या पाठपुरावा व लांजा शहर समन्वय समितीने केलल्या मागणीला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांनी बुधवारी शहरात प्रत्यक्ष भेट देऊन शहरातील परिस्थिती व पुलाची पाहणी केली. यावेळी शहर समन्वय समितीने महामार्गाच्या होत असलेल्या कामाबाबत काही सुधारणा व अपेक्षित बदल मांडले.
शहरातील उड्डाण पूल आणि त्यापुढील दोन्ही बाजूंची पाहणी करण्यात आली. शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी व कर्मचारी दुतर्फा असलेली शासकीय कार्यालये, एस.टी.डेपो या दरम्यानचा भराव पाहण्यात आला. तर रस्त्याच्या दुतर्फाशहरात वाहतुकीच्यादृष्टीने अडचणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी पहिल्या. अंडरपास ब्रीजचे बांधकाम हाती घेण्यापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात विद्यार्थ्यांसाठी स्कायवॉक, पादचारी पूल करणे शक्य असल्यास तो तातडीने केला जाईल असे उपस्थित धिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर सर्व सुविधांची पूर्तता, अंमलबजाणी लवकरात लवकर करावी अशी आग्रहाची मागणी यावेळी लांजा शहर समन्वय समितीने अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभाग मुंबई प्रशांत फेगडे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता कोकण भवन मुंबई संतोष शेलार, सहाय्यक मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता रत्नागिरी विभाग घाडगे, अधीक्षक अभियंता सौ.तृप्ती नाग, महामार्गाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी, शाखा अभियंता रहाटे, मुजुमदार, ठेकेदार यासह लांजा शहर समन्वय समितीने अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, शेखर स्वामी, मंदार भिंगार्डे, नेवरेकर व अन्य सदस्य व शहरातील नागरिक उपस्थित होते.