खेड :
मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे एक हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने शाळेतील गरीब व निराधार विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि मराठी भाषा दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व, तिची परंपरा आणि तिचे जतन करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या बदलत्या काळात मराठी शाळांमधील कमी होत चाललेली पटसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
क्लबचे सदस्य, साहित्यिक व पत्रकार उत्तम कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून मराठी शाळा या केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कारांचे मंदिर आहेत. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन्ही टिकल्या पाहिजेत, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खजिनदार श्री. लोहार, माजी अध्यक्ष रोहन विचारे, मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, पदवीधर शिक्षिका स्वाती राठोड, उपशिक्षक कासार सर तसेच माजी सरपंच श्री. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ वस्तूंचा आधारच मिळाला नाही, तर मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि आत्मविश्वासही मिळाला. मराठी भाषा जपण्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चा प्रेरणादायी उपक्रम; मराठी भाषा गौरव दिनी मराठी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
