रायगड ( मनोज खांबे) : महाशिवरात्रीच्या पवित्र निमित्ताने महाडच्या ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरात यंदा भक्ती, कला आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शिवकालीन परंपरा लाभलेल्या श्री वीरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात तब्बल २५० किलो रंगीत तांदळाचा वापर करून भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारण्यात आली.
महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला महाशिवरात्रीच्या तीन दिवस आधी पासून उत्साहात प्रारंभ झाला असून, मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे. या विशेष पर्वानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रंगीत तांदळाची ही भव्य रांगोळी काढण्यात आली.
वीरेश्वराच्या गाभाऱ्यात पिंडीच्या बाजूला विविध रंगांनी सजवलेल्या तांदळाच्या साहाय्याने अत्यंत नक्षीदार आणि मनोवेधक कलाकृती उभी करण्यात आली. या रांगोळीत पारंपरिक शिवचिन्हे, धार्मिक प्रतीकं आणि आकर्षक रचना यांचा समावेश करण्यात आला होता. २५० किलो तांदूळ रंगवून त्याचे बारकाईने नियोजन करत अनेक तासांच्या मेहनतीनंतर ही कलाकृती पूर्ण करण्यात आली.
ही अनोखी रांगोळी पाहण्यासाठी महाड शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या कलाकृतीचे छायाचित्रण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. भक्तीभाव आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या रांगोळीमुळे मंदिर परिसरात एक वेगळेच आध्यात्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY