मोरबे:३५ वर्ष मोरबे धरणामुळे बाधित झालेल्या चौक मोरबे प्रकल्पग्रस्त जनतेचे प्रश्न संघर्ष न करता सरकारशी संवाद साधून सोडविण्यात येतील, जनजागरण प्रतिष्ठान यांनी आज पर्यंत जे जे काम हाती घेतले ते संवाद साधून सोडविले आहेत, असे प्रतिपादन जनजागरण प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आणि नवी मुंबई महानगर पालिका व पनवेल महानगर पालिकेच्या खारघर, कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण खालापूर तालुक्यातील आठ महसुली गावे आणि आठ आदिवासी वाड्या यांना स्थलांतरित करून मोरबे धरण बांधण्यात आले आहे. आज ३६ वर्ष झाली तरीही योग्य पुनर्वसन आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने मोरबे धरण कृती समिती यांनी जनजागरण प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वाखाली राज्य समन्वयक देवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे. आज मोरबे प्रकल्पग्रस्त यांच्याशी संवाद साधण्यासाठी माधव भंडारी उपस्थित होते, प्रकल्पग्रस्त यांना मार्गदर्शन करताना मोरबे धरणाच्या भूसंपादन ते धरण पूर्ण होईपर्यंत चा इतिहास ऐकला, संघर्ष करून आपले आणि आपल्या पिढीचे नुकसान न करता सरकारशी संवाद साधून तुमचा प्रश्न येत्या काळात सुटेल असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी प्रकल्पग्रस्त जनतेच्या बाजूने उभे असतात, त्यामुळे हाही प्रश्न लवकर निकाली निघेल, असे खात्रीपूर्वक सांगितले. राज्य समन्वयक देवराज देशमुख यांनी प्रकल्पग्रस्त यांनी साथ द्यावी असे आवाहन करून लवकरच संबंधित यंत्रणे बरोबर बैठक होईल असे सांगितले.
जनजागरण प्रतिष्ठान यांनी आज पर्यंत अनेक प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत, त्यामुळे मोरबे प्रकल्पग्रस्त यांचीही समस्या दूर केली जाईल,असे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी जनजागरण प्रतिष्ठान चे राज्य कार्यकारिणी, कृती समितीचे समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष परशुराम मुरकुटे, योगेश प्रबळकर,रायगड अध्यक्ष सतीश जाधव, प्रफुल्ल विचारे, मिलिंद राणे, पाटील, अंकुश वाघ यांच्यासह मोरबे धरण प्रकल्पग्रस्त महिला,पुरुष,बाळ गंगा प्रकल्पग्रस्त, रायगड जिल्ह्यातील कोयना आणि इतर काही प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.