लोटे : पी फास सारखे घातक फोरेव्हर रसायन निर्मिती करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्या विरोधात उभारला जाणारा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली दि. १ फेब्रुवारी रोजी लवेल येथील शेकडो ग्रामस्थांनी एक मुखाने जाहीर केले. या बैठकीचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे आणि हुसेन ठाकूर यांनी केले होते.
पी फास रसायनाची निर्मिती कोकणासारख्या निसर्गरम्य भागात करण्याची परवानगी शासनाने या कंपनीला कशी दिली? हा सवाल येथील पंचक्रोशी आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. याच पार्श्वभूमीवर दि ८ जानेवारी रोजी या कारखान्यावर माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज दळवी यांनी, “या रसायनाबाबत महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडे कोणताही ठोस कायदा अद्याप तयार झालेला नसून जर भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर शासनाकडे कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूदच नाही” याची जाणीव करून दिली. म्हणून जोपर्यंत शासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या रसायनाबाबत ठोस कायदा करत नाही तोपर्यंत या कारखान्यामधील पी फास चे उत्पादन बंद करण्याची मागणी सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने लावून धरली. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापन आणि प्रशासन यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना आणि तमाम कोकणवासी यांना सविस्तर आणि समाधानकारक खुलासा करून हे उत्पादन थांबवण्यासाठी वीस तारखेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र दरम्यानच्या काळात संबंधित यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शेकडो ग्रामस्थांनी निर्धार केला. त्या आंदोलनाची दिशा ठरवणे, योग्य नियोजन आणि आंदोलनाचे स्वरूप ठरवणे यासाठी पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली लवेल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी हुसेन दलवाई यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रदूषणाबाबत समस्या जाणून घेतल्या. आपण गावागावात जाऊन याबाबत जनजागृती करूया..खाडी किनाऱ्याची सर्व गावे आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील सर्व गावे इतकेच नव्हे तर खेड चिपळूण गुहागर या सर्व तालुक्यांमधून फिरवून प्रत्येक गावात सभा घेऊ आणि तेथील लोकांमध्ये जनजागृती करू यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. मी या आंदोलनाचे नेतृत्व करणार नसून तुमच्याबरोबर तुमच्यासारखाच एक नागरिक म्हणून आंदोलनात सहभागी होणार आहे असेहुसेन दलवाई म्हणाले. गावागावांमधून समिता गठित करू यामध्ये रसायनाची सखोल माहिती असणारे तंत्रज्ञ गावातील लोकप्रतिनिधी प्रसारमाध्यमे आणि कायदेशीर सल्लागार हे सर्व आपल्या आंदोलनाचे भाग असतील. यासाठी प्रत्येक गावात मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे असेही त्यांनी सांगितले. यावर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काते सर्व गावातील नागरिकांच्या वतीने दलवाई यांना विनंती केली की,’आम्ही सर्व तुमच्या बरोबरच आहोत, तरीही या आंदोलनाचे नेतृत्व तुम्हीच करावे. एकाही राजकीय लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. अशा परिस्थितीत आपण निस्वार्थीपणे या लढ्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हणून आपणच याचे नेतृत्व करावे,’अशी विनंती केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज दळवी, भरत लब्धे, हुसेन ठाकूर, पर्यावरण तज्ञ डॉ. गुलाबराव राजे, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुमती जांभेकर, नारी सन्मान प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रियंका कारेकर, प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्षा रवीना गुजर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोवळकर, बाबुराव काते, रवींद्र काते,अन्वर भाई खान, गंगाराम इप्ते,दिलीप दिवेकर,दिलीप घाग,संतोष घाग,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत आंदोलनाची जोरदार तयारी करून सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मोठे आंदोलन करून सरकारला जागे करूया असे एकमुखाने ठरवण्यात आले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
