मुंबई : अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेचतेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि डीजीसीए स्तरावर अपघाताची चौकशी सुरूच आहे, सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीवर देखील सकारात्मकरित्या विचार सुरू आहे, असेही श्री. बन यांनी नमूद केले.
अजितदादांची मविआमध्ये यायची इच्छा होती असे सांगणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, एनडीएमध्ये सामील झाले होते याचे भान राऊतांनी ठेवावे. बाष्कळ दावे प्रतिदावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगीरी बंद करून वेब सीरीजचे लेखन सुरू करावे, त्यांचा तो धंदा चांगला चालेल असा टोमणा श्री. बन यांनी लगावला.
अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याच्या माध्यमातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. रोहित पवारांच्या पुढाकाराने आता संजय राऊत राज्यसभेमध्ये हा मुद्दा उचलून तो मार्गी लावणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार असताना त्यांच्याऐवजी रोहित यांना राऊतांची गरज का भासली असा सवाल करीत श्री. बन म्हणाले की, शरद पवार गटाच्या खासदारांना हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेत उचलायला सांगण्याऐवजी प्रसिद्धीच्या हव्यासापायी रोहित हे रोज उठून पत्रकार परिषदांमधून बेफाम आरोप करत आहेत. स्टंटबाजीपेक्षा व्हीएसआर कंपनी संदर्भात असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावे असेही ते म्हणाले.
अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात नाही तर अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला जातो. असा अहवाल यापूर्वीच दाखल झालेला आहे अशी माहिती देत श्री. बन यांनी रोहित यांना लक्ष्य केले. अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत. त्यासाठीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा बालहट्ट रोहित पवारांनी धरला, या शब्दांत श्री. बन यांनी त्यांची खिल्ली उडवली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
