मुंबई :– राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. दरम्यान, सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनापूर्वी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. शेखर निकम यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यालयात जाऊन प्रतिमेचे दर्शन घेतले अन त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात केली. यावेळी निकम यांना दादांच्या आठवणींनी गहिवरून आले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि निकम कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. याचे प्रत्यंतर वेळोवेळी आले आहे. दादा रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट दिली नाही, असे कधीच घडले नाही. दादांनी नेहमीच निकम यांच्या पाठीवर हात ठेवला. यातून अजितदादा पवार यांनी आमदार शेखर निकम यांचा शब्द विकासात्मक कामासाठी कधीही पडू दिला नाही. यामुळे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊ शकला. मात्र, काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले आणि सह्याद्री गहिवरून गेला.

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. तत्पूर्वी, आ. शेखर निकम यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत नतमस्तक झाले आणि यावेळी दादांच्या आठवणीने निकम यांना गहिवरून आले. नंतर आ. निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज करत असताना दादांची वेळोवेळी आठवण येत राहील, अशा शब्दात आमदार शेखर निकम यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.