चिपळूण( विशेष प्रतिनिधी): शहराच्या गोवळकोट आणि पेठमाप येथील आदिशक्ती श्री करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर महाराज यांचा शिमगा महोत्सव हा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. या उत्सवात पेठमापच्या मैदानावर शेरणे काढण्याचा सोहळा हा दरवर्षी अभूतपूर्व उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने होत असतो. यावर्षी मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे गाळ काढण्याच्या नावाखाली नदीचे पात्रच प्रचंड रुंद करून शेरणे काढण्याचे मैदान हे जणू गायब झाले आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

या प्रकाराबद्दल श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ॲड.प्रसाद चिपळूणकर,विश्वस्त महेश सागावकर विश्वस्त सुरेंद्र शिरगावकर आणि काही नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली आहे.

अध्यक्ष ॲड. चिपळूणकर म्हणाले की, शेरणे काढण्याच्या मैदानाचा आकार हा निम्म्यावर आला असून नदीचे पात्र विनाकारण रुंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेरणे सोहळा साजरा करण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध नाही. जी काही थोडी जागा मैदान शिल्लक आहे त्या भागात नदीचे पाणी येते आणि लाखो भक्तांची गैरसोय होते. आम्ही वेळोवेळी हा विषय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नदीमधील गाळ काढायला आमचा अजिबात विरोध नाही, किंबहुना नदीपात्रातील गाळ हा काढलाच पाहिजे तशी आमची आग्रही मागणी देखील आहे. मात्र गाळ काढताना नदीपात्र रुंद करण्याचे कारण काय? त्यासाठी नदीपात्र रुंद करून शेरणे काढण्याचे मैदान अरुंद म्हणजे कमी करण्याचे कारण काय? हे अधिकारी स्वतःला समजतात कोण ?देवी करंजेश्वरच्या शेरणे सोहळा ज्या मैदानावर होतो ते मैदानच गायब होत चालले आहे. हा प्रकार थांबला नाही तर नदीचे पात्र जनतेच्या घरापर्यंत येईल आणि घरातून थेट नदीपात्रात उड्या टाकूनच लोकांना जावे लागेल. या प्रकार बद्दल आम्ही तीव्र नाराज असून लोकप्रतिनिधींना सांगूनही काहीच उपयोग होत नाही अशा शब्दात ॲड. चिपळूणकर, विश्वस्त शिरगावकर ,सागावकर यांनी नाराजी बोलून दाखवली.

उद्या सोमवारी शेरणे काढण्याचा सोहळा…

देवस्थानचा शिमगा महोत्सव सुरू झाला असून आज रविवारी सकाळी श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी यांच्या पालख्यांचे पेठमापात आगमन झाले आहे. या पालख्यांचे मुक्काम आता सहाणेवर असणार असून उद्या सोमवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून पेठमाप मैदानावरच शेरणे काढण्याचा सोहळा सुरू होणार आहे. मात्र मैदानाची अवस्था फारच बिकट असून लोकांची गैरसोय होणार आहे याकडे देवस्थानचे अध्यक्ष ॲड .चिपळूणकर यांनी लक्ष वेधले आहे.