चिपळूण : शहराचे सुप्रसिध्द श्रध्दास्थान, जागृत ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानच्या शिमगा महोत्सवातील अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम आज रविवार दि. ०८ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता चव्हाटयावर मांड भरण्याचा होईल. या प्रसंगी व्यावसायिक व रयतेसाठी वार्षिक राखण करण्याबद्दल श्रींस साकडे घालण्यात येईल.
सदर कार्यक्रमाचे स्थळ जुनी खाटीक गल्ली, बाजारपेठ चिपळूण येथे असते. श्री जुना कालभैरव हा चिपळूण शहराचा राजा असून त्याच्या सात बहिणी, ज्यांची मंदिरे चिपळूण शहराच्या चतु:सिमेला आहेत. त्यामध्ये श्री देवी एकविरा (वडनाका), श्री कात्रादेवी, श्री देवी भवानी, श्री शितलादेवी (श्री क्षेत्र गांधारेश्वर), श्री देवी महालक्ष्मी (खेंड, मिरजोळी), श्री देवी विंध्यवासिनी (रावतळे), श्री देवी करंजेश्वरी (गोवळकोट) आदींचा समावेश आहे.
शिमगा उत्सव निमित्ताने श्री देवी महालक्ष्मी आणि श्री देवी करंजेश्वरी यानी आपल्या चतु:सिमेत घरोघरी फिरून रयतेची गाऱ्हाणी ऐकलेली असतात. त्याचप्रमाणे श्री जुना कालभैरव व त्याचा थोरला भाऊ श्री देव केदारही सहपत्नीक आपल्या चतु:सिमेत घरोघरी फिरून गाऱ्हाणी ऐकत असतात व आपल्या सात बहिणींची भेटही घेतात व या भेटीतच रंगपचमीच्या रात्री आपआपल्या चतु:सिमेतील ख्यालीखुशालीवर गाऱ्हाण्यावर चव्हाटयावर विचारविनिमय करण्याचे निमंत्रण श्री जुना कालभैरव सर्वांना देत असतात.
या चव्हाटा कार्यक्रमप्रसंगी श्री देव जुना कालभैरव, श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार, श्री देवी जाखमाता, श्री देवी करंजेश्वरी श्री देवी वींध्यवासिनी या सर्व देवदेवता आपल्या सर्व अठरापगड जाती जमातीपैकी सर्व मानकरी, सेवेकरी, विश्वस्त कार्यकर्ते आदी लवाजम्यासह चव्हाटयावर भरण्यात येणाऱ्या मांडावर उपस्थित असतात. या ठिकाणी जाहिररित्या अर्ज व गाऱ्हाणे घालण्याची परम्परा आहे. या सर्व देवीदेवता आपल्या रयतेची गाऱ्हाणी, अर्ज यावर जाहिररित्या विचार विनिमय करतात. यासाठी नवसही बोलले जातात. चव्हाटा स्थळी उपस्थित भक्तगण, नागरिकांनी शांतता स्तब्धता पाळण्याची विनती आहे. गुळ, खोबर आणि सुपारीचा प्रसाद उपस्थिताना वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
