चिपळूण: शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगा महोत्सवाला मोठ्या जल्लोषात आणि अपूर्व उत्साहात आज शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून प्रारंभ झाला. यावर्षी देवीच्या पालखीत देवस्थानने घडवलेल्या ९०० ग्रॅम सुवर्ण मुखवट्याची स्थापना करण्यात आली आहे. या मुखवट्याचे दर्शन घेऊन भाविक सुखावून जात आहेत. देवीचा कौल घेतल्यानंतर देवस्थान कमिटीने पालखीच्या मध्यभागी हा नवीन सुवर्ण मुखवटा बसवला आहे.
श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवीच्या सजवलेल्या चांदीच्या पालख्यांनी पेठमापकडे प्रस्थान ठेवले आणि हजारो भक्तांनी एकच जल्लोष केला. मंदिराला प्रदक्षिणा करून सर्वप्रथम गोळकोट येथील मुस्लिम भाविक श्री. नईम चौगुले यांच्या घरापाशी पालख्या गेल्या आणि तिथे मानाची पूजा झाल्यानंतर तेथील मशिदीची भेट घेऊन आणि सहाणे समोरील होम पेटवून दोन्ही पालख्या गोविंदगडावर गेल्या. तेथे सहाणेवर स्थानापन्न झाल्यावर जगताप कुटुंबीयांकडून मानाची पूजा झाली. त्यानंतर पालख्या पेठमापकडे मार्गस्थ झाल्या.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे पेठमाप, गोवळकोट आणि मजरेकाशी येथील ग्रामस्थ आणि शेकडो स्वयंसेवक शिमगा महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत.
उद्या रविवार दि.१ मार्च रोजी पेठमापमधील विविध समाजाचे होम प्रज्वलित करून पालख्यांचा मुक्काम पेठमापच्या सहाणेवर होणार आहे. त्या ठिकाणी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. सोमवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत पेठमापच्या विस्तीर्ण मैदानावर शेरणे काढण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम होईल आणि त्यानंतर ३ मार्च रोजी गोवळकोटचा शिमगा झाल्यावर सायंकाळी उशिरा चार दिवसीय शिमगा महोत्सवाची सांगता होईल.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
