चिपळूण: परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दैवदुर्लभ निर्गुण पादुका, पालखी आणि चैतन्यदायी मूर्तीचे चिपळूणमध्ये काल रविवारी सायंकाळी वाजत गाजत स्वामीनामाच्या जयघोषात उत्साही वातावरणात आगमन झाले. सायंकाळपासून वेस मारुती येथील सजवलेल्या प्रांगणात पालखी विराजमान झाली असून सायंकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. आज सोमवारी संपूर्ण दिवसभर याच मंडपात भाविकांना पालखी आणि मूर्तीचे दर्शन घेता येईल.

काल सायंकाळी मार्कंडी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात पालखीचे आगमन झाल्यानंतर पूजाअर्चा आणि स्वागत विधी पार पडले.त्यानंतर मार्कंडी मठ ते वेस मारुती मंदिरापर्यंत टाळ मृदुंगाच्या साथीने स्वामी नामाचा जयजयकार करीत भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीने पालखीचे वेस मारुती मंदिराच्या समोरील प्रांगणात आगमन झाले. त्यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शन घेण्यास प्रारंभ करण्यात आला.

चिपळूण येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज परिवारातर्फे गेल्या २४ वर्षापासून स्वामींच्या पालखी दर्शन सोहोळ्याचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी हा दर्शन सोहोळा वेस मारुती मंदिरासमोर साजरा होतो. यंदाही दोन दिवस स्वामींच्या मूर्ती, पादुका आणि पालखीचे भाविकांना दर्शन घेता येत आहे.

आज २३ फेब्रुवारी रोजी पहाटे स्वामींच्या पादुकांवर दुग्धाभिषेक त्यानंतर नामजप, स्वामी पाठ,भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण दिवसभर स्वामी भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. उद्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा दुग्धाभिषेक झाल्यानंतर सकाळी आठ वाजता पुढील प्रवासासाठी पालखी रवाना होईल. अशा पद्धतीने यंदाचे पालखी दर्शन सोहोळ्याचे नियोजन आहे. हा दर्शन सोहोळा यशस्वी करण्यासाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज परिवाराचे सर्व सदस्य अविश्रांत परिश्रम घेत आहेत.

दरवर्षी स्वामींच्या पालखीच्या आगमनामुळे भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. यंदाही भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालखी आली त्या दिवसापासूनच दर्शनासाठी सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. दर्शन सोहळा अतिशय शिस्तबद्धपणे सुरू आहे.