चिपळूण : चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार, दिनांक १ मार्च रोजी सकाळी १० वाजता पेठमाप येथे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, आमदार शेखर निकम, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रम नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
जिल्हास्तर नगरोत्थान सन २०२४-२५ अंतर्गत खेंड मापारी मोहल्ला येथे रहमान गोठे यांच्या घरापासून इसाक अष्टीकर यांच्या घरापर्यंत आर.सी.सी. गटार बांधकाम, खेंड बडदेवाडी येथे रविंद्र डांगे यांच्या घरामागे आर.सी.सी. संरक्षक भिंत बांधणे, तसेच देसाई मोहल्ला कब्रस्तान येथे शिवनदी पात्रालगत आर.सी.सी. संरक्षक भिंत उभारणे, ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. विशेष रस्ता अनुदान सन २०२३-२४ अंतर्गत पेठमाप रोड इंडियन जिम ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत आर.सी.सी. गटार बांधकाम, ओतारी घर ते इंडियन जिम रिक्षा स्टॅण्डपर्यंत गटार बांधणे तसेच मेनरोड ते लोकरे घरापर्यंत दोन्ही बाजूंनी आर.सी.सी. गटार उभारण्यात येणार आहे. मागासवर्गीय कल्याण समिती सन २०२५-२६ अंतर्गत प्रांत कार्यालय शेजारी हायवे क्र. ६६ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. न.पा. फंड (रस्ते दुरुस्ती) सन २०२५-२६ अंतर्गत
पागमळा भागातील शिंदेमळा ते परांजपे स्किम गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला लोकसभा, विधानसभा व विधान परिषद सदस्य, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नगर परिषदेतील सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, याच कार्यक्रमात मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण नगर परिषदेच्या वतीने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार असून, साहित्य क्षेत्रातील अकरा ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना नागरिक व साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
