उरण (प्रतिनिधी): उरण पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ८ पैकी ७ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवत निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भेंडखळ गणातून निवडून आलेले दीपक भोईर यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी उरण तालुक्यातील शिवसैनिकांकडून जोर धरू लागली आहे.
या निवडणुकीत नवघर गणातून परेश पाटील (उबाठा), भेंडखळ गणातून दीपक भोईर (उबाठा), जासई गणातून निर्मला घरत (शेकाप), चिरले गणातून प्रियांका मढवी (शेकाप), चिरनेर गणातून कविता पाटील (उबाठा), आवरे गणातून प्रारंभी गावंड (शेकाप) आणि केगाव गणातून महेश म्हात्रे (शेकाप) असे महाविकास आघाडीचे सात उमेदवार निवडून आले आहेत. चाणजे पंचायत गणातून भाजपचे कैलास भोईर हे एकमेव सदस्य निवडून आले आहेत.
८ पंचायत गणांपैकी ७ गणांमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाल्याने उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे आता सभापतीपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
याआधीच्या काळात पंचायत समितीमध्ये शेकाप, शिवसेना आणि भाजप यांचे स्वतंत्र संख्याबळ होते. त्यावेळी झालेल्या युतीनंतर चिठ्ठीद्वारे सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यात आली होती आणि दोन्ही पदे शेकापकडे गेली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शेकापचा उमेदवार निवडून आल्याने त्यांची सत्ता अधिक मजबूत झाली होती.
मात्र सध्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे यश मिळाल्याने सभापतीपदाचा मान आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळावा आणि तो दीपक भोईर यांनाच द्यावा, अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी मांडली आहे
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
