उरण (घनःश्याम कडू) : उरण शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांमुळे सध्या नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहराच्या अंतर्गत भागातील अरुंद रस्त्यांवर मिक्सर डंपर, ट्रक तसेच लोखंडी सळ्या व बांधकाम साहित्य वाहून नेणार्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उरण शहरातील मध्यवर्ती व वस्तीच्या भागांतील रस्ते आधीच अरुंद असल्याने या मार्गांवर अवजड वाहने शिरताच समोरून येणार्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहनांची रांगच्या रांग लागून दीर्घकाळ वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अवजड वाहनांचा वेग मंद असल्याने मागून येणारी वाहनेही जागीच थांबतात आणि संपूर्ण रस्ता वाहतूक कोंडीत अडकतो.
शहराच्या ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्या भागांमध्ये सध्या अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, त्यासाठी सिमेंट मिक्सर, लोखंडी साहित्य, बांधकाम साहित्याची ने-आण करणारी मोठी वाहने दिवसभर रस्त्यावर फिरत आहेत. ही वाहने वळवताना किंवा अरुंद वळणांवर घेताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.याशिवाय, या पुनर्विकास कामांमुळे शहरातील अनेक भागांत धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अंतर्गत भागात अवजड वाहनांच्या प्रवेशावर वेळेचे बंधन, पर्यायी मार्गांची व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उरण-नेरूळ-बेलापूर रेल्वे मार्गावर प्रवाशांत लक्षणीय वाढ .वेळापत्रक सुधारणा व सुरक्षेची मागणी तीव्र
उरण (घनःश्याम कडू) : नवी मुंबईतील उरण-नेरूळ-बेलापूर रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली असून, जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 23 लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला आहे. 2024 मध्ये ही संख्या 19 लाख होती. त्यामुळे एका वर्षात सुमारे 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू तसेच परिसरातील विविध विकास प्रकल्पांमुळे उरण, द्रोणागिरी, तारघर, गव्हाण व नेरूळ परिसरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. या वाढत्या प्रवासीसंख्येमुळे रेल्वे मार्गावरचा ताणही वाढला आहे.प्रवाशांची वाढ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने डिसेंबर 2025 पासून अप व डाऊन मार्गावर 10 नवीन लोकल फेर्या सुरू केल्या असून, तरघर आणि गव्हाण स्थानकांवर लोकल थांबे देण्यात आले आहेत. मात्र सध्याचे वेळापत्रक प्रवाशांच्या गरजांना अपुरे ठरत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत लोकल फेर्या एक तासाच्या अंतराने असल्याने प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. दुपारच्या वेळेत बेलापूर-नेरूळ मार्गावर एक ते दीड तास लोकल न मिळाल्याने नोकरदार, विद्यार्थी व महिलांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय रात्री 10.30 वाजता शेवटची लोकल असल्याने उशिरा प्रवास करणार्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, उरण परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या महागड्या वस्तूंची दमदाटी करून चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पर्स, दागिने आदी वस्तू चोरण्यात येत असून, रात्रीच्या वेळेत सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
या पार्श्वभूमीवर उरण तालुका मराठी पत्रकार संघाने रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल फेर्या अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू कराव्यात, उरण स्थानकातून सीएसएमटी, ठाणे आणि पनवेलपर्यंत थेट वातानुकूलित लोकल सेवा लवकर सुरू करावी, तसेच नवी मुंबई ते उरण दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाशी होणारी जोडणी आणि भविष्यातील विकास प्रकल्प लक्षात घेता या मार्गावरील प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या नवीन फेर्यांमुळे मागील दोन वर्षांत सुमारे 42 लाख प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत झाला असून, भविष्यात या मार्गावरील रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रवासीअनुकूल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
