दापोली : पंचायत समिती दापोलीच्या सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील वार्षिक आमसभा गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा होणार आहे.
ही आमसभा राधाकृष्ण मंदिर, दापोली येथे आयोजित करण्यात आली असून, दापोली तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समिती दापोली प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या आमसभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तालुक्यातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच विविध प्रशासकीय विषयांवर या आमसभेत विचारविनिमय होणार आहे.
दरम्यान, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने दापोली तालुक्यातील नागरिकांनी आपली निवेदने वेळेत लेखी स्वरूपात पंचायत समिती दापोली कार्यालयाकडे सादर करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपली निवेदने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावीत. तसेच निवेदने पाच प्रतींमध्ये, प्रत्येक निवेदन स्वतंत्र A4 कागदावर सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भातील माहिती पंचायत समिती दापोलीचे सचिव, आमसभा तथा गटविकास अधिकारी (गट-अ) गणेश मंडलिक यांनी दिली आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या लेखी स्वरूपात प्रशासनापर्यंत पोहोचवून आमसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.