दिवसभर संगणकासमोर बसणे, सतत वाकून काम करणे तसेच चुकीच्या पद्धतीने वस्तू उचलणे यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि थकवा यांसारख्या आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. या समस्या टाळण्यासाठी एर्गोनॉमिक्स म्हणजेच कामाचे ठिकाण शरीराला अनुकूल बनवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
एर्गोनॉमिक्स म्हणजे काय?
काम करताना शरीरावर कमीत कमी ताण पडेल आणि जास्तीत जास्त आराम मिळेल, अशा प्रकारे टेबल, खुर्ची, संगणक आणि इतर साधनांची मांडणी करणे म्हणजे एर्गोनॉमिक्स. यामुळे वेदना कमी होण्यास, ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते.
एर्गोनॉमिक्सचे ६ महत्त्वाचे टप्पे
चांगल्या एर्गोनॉमिक्ससाठी पुढील ६ टप्पे पाळणे आवश्यक आहे :
पाठीला योग्य आधार द्या – खुर्चीचा योग्य आधार पाठीला मिळेल अशा पद्धतीने बसा.
मूल्यांकन करा – कामाच्या जागेची आणि आपल्या कामाच्या सवयींची तपासणी करा.
समायोजन करा – स्क्रीन, कीबोर्ड आणि खुर्ची योग्य उंचीवर ठेवा.
हालचाल करा – दर ३० मिनिटांनी सुमारे २ मिनिटे उठून शरीराला स्ट्रेच करा.
उत्पादकतेवर लक्ष द्या – आरामदायी वातावरणात काम केल्याने कामाचा दर्जा आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते.
सतत सुधारणा करा – गरजेनुसार कामाच्या जागेत आणि सवयींमध्ये बदल करत राहा.
रोजच्या वापरासाठी १० सोपे नियम
सरळ बसा – पाठीला पूर्ण आधार द्या.
योग्य पोश्चर ठेवा – स्क्रीन डोळ्यांच्या समोर असावी आणि हात कोपरातून साधारण ९० अंशांच्या कोनात असावेत.
ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या – सीट आणि स्टिअरिंग योग्य पद्धतीने समायोजित करा.
वस्तू उचलताना योग्य पद्धत वापरा – पाठीने न वाकता गुडघे वाकवून वस्तू उचला.
जास्त उंचीवर काम करणे टाळा – अवजड वस्तू उचलण्यासाठी आवश्यकतेनुसार मदत घ्या.
लवचिक खुर्ची वापरा – गरजेनुसार तिची उंची आणि स्थिती बदलता येईल, अशी खुर्ची वापरा.
आवाज कमी ठेवा – ताण कमी करण्यासाठी शक्यतो शांत वातावरणात काम करा.
स्क्रीनचा ब्राइटनेस योग्य ठेवा – डोळ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.
वेदनांकडे दुर्लक्ष करू नका – शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष द्या.
सतत मूल्यांकन करा – आठवड्यातून किमान एकदा आपल्या बसण्याच्या पद्धतीचे आणि कामाच्या जागेचे परीक्षण करा.
एर्गोनॉमिक्सचे फायदे
एर्गोनॉमिक्सच्या योग्य वापरामुळे वेदना आणि थकवा कमी होण्यास, एकाग्रता वाढण्यास, आजारपणामुळे घ्यावी लागणारी रजा कमी करण्यास आणि उत्पादकता वाढविण्यास मदत होते. याचा फायदा केवळ कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाच नाही, तर विद्यार्थी, गृहिणी, चालक आणि शेतकरी यांनाही होऊ शकतो.
तज्ज्ञांचे आवाहन
तज्ज्ञांच्या मते, कामाच्या ठिकाणी छोटे-छोटे बदल केल्यास अनेक शारीरिक समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. चांगली खुर्ची, योग्य उंचीचे टेबल आणि मधूनमधून विश्रांती घेण्यासारख्या सवयी अंगीकारल्यास दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते.
“आजच आपल्या कामाच्या जागेत छोटे बदल करा. आपल्या शरीराची योग्य काळजी घ्या. शरीराला जपा, ते तुम्हाला आयुष्यभर साथ देईल,” असे आवाहन करण्यात आले आहे.
– सानिया इरफान बिजले
तृतीय वर्ष, बी.पी.टी.
फिजिओथेरपी विद्यार्थिनी
