धाराशिव : आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी शासनाने १ हजार ८६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. मात्र, या आराखड्यातील तरतुदी आणि प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांवरून तुळजापुरात वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर निविदा जाहीर केल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या आराखड्यातील प्रस्तावित कामे शहराच्या पश्चिम भागात केली जाणार असल्याने पुजारी वर्गाने त्याला विरोध दर्शवला आहे. विकासकामांना विरोध नसून, सर्व कामांना शहराच्या पूर्व भागात प्राधान्य द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. याच मागणीसाठी पुजारी आणि स्थानिक नागरिकांनी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने आराखड्यात बदल करून सर्व घटकांना विश्वासात घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करत तुळजापूर शहर बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.