मुंबई : विद्यापीठाच्या कलीना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाचा चौथा दिवस तथ्य, फिक्शन, युद्धभूमी, गुजराती साहित्य, इतिहास, महात्मा ज्योतिबा फुले, ग्रंथपाल, वाचन संस्कृती, स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज, पौराणिक कथा तसेच पॅरालिम्पिक खेळाडूंचे अदम्य धैर्य आणि विजय अशा विविध विषयांना समर्पित राहिला.
चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारताचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके दिसून आली. इंग्रजी, मराठी आणि हिंदी पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी वाचकांची मोठी गर्दी झाली होती. वाचकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्टॉलधारकही आनंदी असल्याचे दिसून आले. एका स्टॉलधारकाने महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंतच असल्याचे सांगत, आणखी दोन-तीन दिवस महोत्सवाची मुदत वाढविण्यात आली असती तर अधिक चांगले झाले असते, अशी भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात भारतीय पौराणिक कथांच्या आधुनिक आणि नव्या स्वरूपातील मांडणीवर आनंद नीलकंठन यांनी श्वेता पडदा यांच्याशी संवाद साधला. वाचकांची पुस्तकांमधील रुची वाढविण्यासाठी लेखकांनी नव्या प्रयोगांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वराज्य आणि राज्यकारभार’ सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चर्चा
‘स्वराज्य आणि राज्यकारभार’ या सत्रात मेधा देशमुख भास्करन यांनी वर्षा मुळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, नेपोलियन बोनापार्ट यांच्यावर इंग्रजी भाषेत शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, त्यांच्यापेक्षा शेकडो पटींनी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर तुलनेने कमी पुस्तके उपलब्ध आहेत.
महोत्सवाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मुख्य आयोजक अमित साटम आणि मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांचेही कौतुक केले. महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तक स्टॉल्स असून, विविध साहित्यप्रकार आणि विविध भाषांमधील पुस्तकांचा व्यापक संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महापुरुषांना केवळ घोषणांपुरते मर्यादित ठेवणे ही आपल्या विचारांची मर्यादा : अंशुल चतुर्वेदी
लेखक आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद यांना ‘उठा, जागे व्हा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘दिल्ली चलो’ या घोषणांपुरते मर्यादित ठेवणे ही दुर्दैवी बाब आहे. या महापुरुषांचे जीवन, संघर्ष आणि विचार या घोषणांपेक्षा कितीतरी व्यापक आहेत.
कलीना विद्यापीठ परिसरात आयोजित पुस्तक महोत्सवात फिल्ममेकर नीला माधब पांडा यांच्याशी संवाद साधताना चतुर्वेदी बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतच्या चर्चांमध्ये जितकी ऊर्जा खर्च केली जाते, त्यातील निम्मी ऊर्जा जरी त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा अभ्यास करण्यासाठी वापरली, तरी त्यातून बरेच काही शिकता येईल, असे त्यांनी नमूद केले.
स्वामी विवेकानंद यांनी गुंतागुंतीचे धार्मिक तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले. आजच्या तरुणांनी सोशल मीडियावरील वरवरच्या संदेशांपलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार वाचावेत, समजून घ्यावेत आणि ते आपल्या जीवनात आचरणात आणावेत, असे आवाहनही अंशुल चतुर्वेदी यांनी केले.
शिकत राहाल, तर जिंकत राहाल: दीपा मलिक
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरात आयोजित पुस्तक महोत्सवात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक यांनी युवकांना यशाचा मंत्र देताना सांगितले की, जीवनात सतत शिकत राहाल, तर जिंकत राहाल. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी कधीही हार मानू नये. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिकण्याची जिद्द हाच यशाचा मार्ग प्रशस्त करतो, असे त्यांनी सांगितले.
मोहम्मद मुर्तजा अली यांच्याशी संवाद साधताना दीपा मलिक यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, आव्हाने आणि मिळवलेल्या यशाचा अनुभव कथन केला.
महोत्सवात लेफ्टनंट कमांडर विजय नायर, अवरीन जैदी आणि डॉ. अपर्णा नागदा यांच्याशी अवनी कट्टकर यांनी संवाद साधला. यावेळी वक्त्यांनी आपले अनुभव कथन करत युवकांना आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहण्यासाठी प्रेरित केले.