चिपळूण: महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, कार्यालय चिपळूण अंतर्गत महानिर्मिती कॉलनी, पोफळी येथील कामगार कल्याण केंद्रात रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कामगार कल्याण मंडळाचा ८८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने सभासदांचे स्नेहसंमेलन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘व्यसनमुक्तीमध्ये महिलांचा सहभाग’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. गुणवंत कामगार, पोफळी येथील सुनीता परमाने यांनी उपस्थित महिला सभासदांना व्यसनमुक्तीचे महत्त्व, कुटुंब व समाजामध्ये महिलांची भूमिका तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी महिलांनी घ्यावयाचा पुढाकार याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांनी गीतगायनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या उपक्रमांमुळे उपस्थित महिलांना आनंददायी वातावरणात एकत्र येण्याची व आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमास समीक्षा मानकर, सविता घोलपकर, वेदांकी कदम, ज्योती ससाने, माधवी शिर्के, वर्षा कांबळे, अवनी शिगवण, सुरभी मोहिते, शुभ्रा डांगरे यांच्यासह इतर महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या स्नेहसंमेलन व महिला मेळाव्यामुळे महिलांमध्ये सामाजिक जाणीव, व्यसनमुक्तीचा संदेश आणि परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत होण्यास मदत झाली,असे प्रतिपादन कामगार कल्याण केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता सुधाकर सुवार यांनी करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.