मंडणगड : मंडणगड तालुक्यातील पाले बौद्धवाडी येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अंत्ययात्रेच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. झाडाझुडपे, दगडधोंडे आणि अरुंद पायवाटेतून अंत्ययात्रा न्यावी लागत असल्याने या मार्गाचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी या समस्येची दखल घेत स्वखर्चाने जेसीबीच्या साह्याने तात्पुरता रस्ता तयार करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुलभ होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजनेबरोबरच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
या पाहणीवेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, तसेच ग्रामस्थ मनोज जाधव, जयवंत जाधव,आणि सदानंद जाधव उपस्थित होते.
