चिपळूण : रणरणत्या उन्हात सावलीचा आसरा शोधत, हातात दोनशे रुपये घेऊन तासनतास रांगेत एसटी स्थानकावर उभी असलेली माणसं… हे दृश्य सध्या रोजचं झालं आहे. चिपळूण स्थानकावर सध्या गर्दी असते ती दोनशे रुपये देऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीच्या पाससाठी. सवलत जाहीर झाली तेव्हा या पासची गरज नव्हती; आधारकार्ड चालायचं. मग आताच दोनशे रुपयांचा हा पास म्हणजे सामान्य प्रवाशांना नुसता भुर्दंड नव्हे काय? अशी प्रतिक्रिया गोरगरीब जनतेकडून दिली जात आहे.