मुंबई- राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, उन्हाच्या चटक्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ११ एप्रिलच्या ताज्या अंदाजानुसार, राज्याच्या तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक भागांत उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने किनारपट्टी वरील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि रत्नागिरी या ६ जिल्ह्याला उष्णेतचा येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांतील कमाल तापमान ३२°C ते ३८°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. या भागातील नागरिकांनी उष्णतेशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी कोणताही अधिकृत इशारा जारी करण्यात आला नसला तरी, सातारा जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान वाढत असल्याने उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुद्धा उष्णतेच्या मोठ्या झळा अनुभवायला मिळतील. मराठवाडा विभागात, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. येथील तापमान ३९°C ते ४२°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उन्हाचा सर्वात जास्त चटका कुठे अनुभवायला मिळत असेल तर तो विदर्भात. नागपूर, अमरावती वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४०°C ते ४५°C च्या दरम्यान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये. उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
