कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर गुरुवारी रात्री विधिवतपणे सोन्याचा 1.5 किलो वजनाचा, साडेतेरा फूट उंच कळस बसवण्यात आला आहे. हा सुवर्ण कलश गोव्यातील दानशूर भाविकाने अधिक मासाच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने देणगी म्हणून अर्पण केले होते.

दान दिलेल्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही. मूळ 6 फूट उंच शिखराभोवती पावसापासून संरक्षणासाठी 200 किलो तांब्याचे आवरण बसवण्यात आले असून त्यावर सोन्याचा मुलामा आहे. क्रेनच्या साहाय्याने आणि सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने रात्रभर सावधपणे हे काम पूर्ण करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे हे यावेळी देखरेख करत होते. शुक्रवारी सकाळी वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधी पार पडले आहेत. या नवीन कलशाचे दर्शन घेण्या साठी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.