पोलादपूर (शैलेश पालकर) : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील मायलेकी जागीच ठार झाल्या, तर बापलेक गंभीर जखमी झाले. हे कुटुंब अहिल्यानगर येथून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जात होते.

पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याबाहेर आयशर ट्रक (क्र. एमएच ४६ एलवाय १६३८) उभा करून चालक नदीकिनारी शौचास गेला असता, उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून येणाऱ्या कारने (क्र. एमएच ०८ एएन २४३९) महामार्ग सोडून जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक तथा दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी अनिल रावसाहेब मरकड (वय ४४) आणि त्यांचा मुलगा चिन्मय मरकड (वय ५) हे गंभीर जखमी झाले. अनिल मरकड यांना अधिक उपचारांसाठी मुंबईकडे पाठविण्यात आले असून, मुलगा चिन्मय याला महाड येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड (वय ४५) व मुलगी अनुश्री मरकड (वय १६) यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार व पोलीस कर्मचारी तसेच नरवीर आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. अपघातातील जखमी अनिल मरकड हे अहिल्यानगरचे मूळ रहिवासी असून, त्यांची पत्नी सुवर्णा मरकड या दापोलीतील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी होत्या. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.