कोसबी : कोसबी ग्रामस्थ कार्यकर्ता मेळावा तसेच डिकेवाडी व मधलीवाडी ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी विविध विकासकामांचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. आजपर्यंत झालेल्या विकासकामांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आगामी काळातही विकासकामांसाठी आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, माजी सभापती विजयराव गुजर, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य मनस्वी बैकर, पंचायत समिती सदस्य शरद शिगवण यांनी विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील निकालाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, निवडणुकीच्या राजकारणापेक्षा मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देत आमदार शेखर निकम यांना आगामी निवडणुकांमध्ये भक्कम पाठिंबा देण्याची भूमिका यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात मुलींचे शिक्षण, मुलांचे शिक्षण, पर्यटन विकास आणि रोजगारनिर्मिती या विषयांवर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली. केवळ रस्ते, गटारे, संरक्षण भिंती आणि पाखाड्या उभारल्याने गावाचा सर्वांगीण विकास होणार नाही, तर गावातील तरुणांना लहान-मोठे व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी संधी निर्माण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

“तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी गावातच उपलब्ध झाल्या, तर गावातील लोक गावात राहतील आणि त्यातूनच गावाचा खरा विकास साधला जाईल. गावागावांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. विकासाच्या बाबतीत गटातटाचे राजकारण न करता प्रत्येकाने गावाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत,” असे आवाहन आमदार निकम यांनी केले.

दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत जयराम डिके, महेश डिके, तुकाराम महादेव, लक्ष्मण बामणे यांच्यासह डिकेवाडी व मधलीवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) पक्षप्रवेश केला. आमदार शेखर निकम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत केले. पक्षप्रवेशाचा निर्णय विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.