लांजा :(गोविंद चव्हाण) : रामचंद्र मापणकर गुरुजी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांचे काम व योगदान हे प्रेरणादायी आहे त्यांचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे व तशी वाटचाल केली तर जावडे गावाबरोबर तालुक्याची गुणवत्ता नक्की वाढेल असा विश्वास जावडे गावचे उपसरपंच व उद्योजक चंद्रकांत गवाणकर यांनी जावडे येथे केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शाळा जावडे न. ०१ चे मुख्याध्यापक रामचंद्र मापणकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी चंद्रकांत गवाणकर बोलत होते .यावेळी रामचंद्र मापनकर सर सपत्नीक उपस्थित होते. तसेच जावडे गावच्या सरपंच सौ. जान्हवी सोडये, व्यवस्थापक कमिटीच्या अध्यक्ष सौ. अनन्या शिंदे , जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ नामये , तंटामुक्त अध्यक्ष सीताराम नामये, गावप्रमुख सीताराम सोडये , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गवाणकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण शिंदे, मुख्याध्यापक रामदास कदम, कातळवाडी शाळेचे मुख्याध्यापक विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामचंद्र मापणकर यांचा शाळा व्यवस्थापन समिती, जावडे ग्रामपंचायत तसेच शाळा व विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सपत्नीक सत्कार करून चांदीची मूर्ती भेट देण्यात आली तसेच गेली १७ वर्षे जावडे प्राथमिक शाळेसाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या योगदानाविषयी अनेकांनी मापणकर यांचे कौतुक केले. तसेच मापणकर गुरुजी यांनी देखील इतक्या वर्षाचा अनुभव तसेच ग्रामस्थांचे सहकार्य याविषयी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रिया मांडवकर व द्विविजय पाटील तसेच सर्व पालक व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली